‘प्रवास तिरंगी झेंड्याचा’

लहानपणापासून शाळेत आपण सर्वजण भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दल शिकलो आहोत. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे रोजी भारतात हा ध्वज फडकवला जातो. पण आज दिसणारा तिरंगी ध्वज येण्यापूर्वी, पारतंत्र्यापासून ते स्वतंत्र भारत अस्तित्वात येईपर्यंत पाच वेळा भारताचा ध्वज बदलला गेला आहे. कसा होता हा प्रवास ? का बदलले गेले हे झेंडे ? हे आज आपण पाहणार आहोत.

 

ब्रेनविशेष | तिरंगा ध्वज


भारत स्वातंत्र्य होऊन आज ७५ वर्ष पूर्ण झाले. भारत पारतंत्र्यात असताना असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. प्रसंगी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदानही दिले. या सर्व गोष्टी आपण जाणतोच, मात्र गेले ७०-७४ वर्ष भारताचा तिरंगी ध्वज फडकताना आपण पाहत आहोत तोदेखील कालानुरूप बदलत गेला हे तुम्हाला माहित आहे का?

लहानपणापासून शाळेत आपण सर्वजण भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दल शिकलो आहोत. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे रोजी भारतात हा ध्वज फडकवला जातो. पण आज दिसणारा तिरंगी ध्वज येण्यापूर्वी, पारतंत्र्यापासून ते स्वतंत्र भारत अस्तित्वात येईपर्यंत पाच वेळा भारताचा ध्वज बदलला गेला आहे. कसा होता हा प्रवास ? का बदलले गेले हे झेंडे ? हे आज आपण पाहणार आहोत.

भारताच्या तिरंग्या झेंड्यातला पहिला रंग केशरी. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या सैनिकांनी बलिदान दिले त्यांच्या बलिदानाच आणि त्यागाचे प्रतीक म्हणून केशरी रंग. दुसरा म्हणजे, मधला रंग आहे पांढरा. शांत आणि सत्याचं प्रतीक. त्यावर असणारे निळ्या रंगाचं धर्मचक्र गतीचं द्योतक आहे. तर तिसरा रंग आहे हिरवा, सुजलाम-सुफलाम ऐश्वर्याचं प्रतीक आहे.

● असा होता भारताचा पहिला ध्वज

– कोलकता

लाल, पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे तीन पट्टे. मध्यभागी ‘वंदे मातरम्’ हे शब्द आणि लाल पट्ट्यावर चंद्र-सूर्य, तर हिरव्या पट्ट्यावर 8 कमळ असा हा झेंडा होता. हा तिरंगी ध्वज ‘भारताचा पहिला झेंडा’ मानला जातो. ७  ऑगस्ट १९०६ रोजी  तत्कालीन कलकत्त्याच्या पारसी बागान स्क्वेअरमध्ये हा ध्वज फडकविण्यात आला.

– जर्मनी

भारताचा दुसरा ध्वज १९०७ साली झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदे’त (International Socialist Conference) फडकवला होता. जर्मनीच्या स्टुटगार्टमध्ये मादाम भिकाजी कामांनी हा ध्वज फडकवला होता. या झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा, मधला पट्टा पिवळा, तर खालचा पट्टा केशरी होता. मादाम कामा या भारताबाहेर राहून भारतातील ब्रिटीश राजवटीविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक होत्या. १९३६ साली त्या भारतात परत आल्या, तेव्हा त्यांनी हा ध्वज भारतात परत आणला. या ध्वजातील केशरी पट्ट्यावर चंद्र आणि सूर्य होते, तर हिरव्या पट्टयावर तेव्हाच्या आठ प्रांतांचं प्रतीक म्हणून ८ तारे होते. पहिल्या ध्वजाप्रमाणेच मधल्या पट्ट्यावरही ‘वंदे मातरं’ ही अक्षरं होती.

– भारत

लोकमान्य टिळक आणि डॉ. ऍनी बेझंट यांनी 1917 साली सुरू केलेल्या ‘होमरुल चळवळी’ने वेग धरला होता. याच चळवळीदरम्यान लोकमान्य टिळक आणि डॉ. ऍनी बेझंट यांनी भारताचा तिसरा झेंडा फडकवला. या झेंड्यावरचे रंग आणि पट्टे काहीसे बदलले होते. या झेंड्यावर पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एकाआड एक या पद्धतीने होते. या ध्वजावर सात तारे होते. हे सात तारे आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षींच्या आकृतीप्रमाणेच झेंड्यावरही काढले होते. १९१८  साली लोकमान्य टिळकांनी होमरूलच्या काही स्वयंसेवकांबरोबर हा झेंडा हाती घेतलेला फोटोत पाहायला मिळतो.

– आंध्रप्रदेश, भारत

1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर 1920 सालापर्यंत लोकमान्य  टिळक आणि नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारताच्या  स्वातंत्र्याची चळवळ वेगाने सुरु झाली. 1921 साली आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये (तेव्हाच बेझवाडा) काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. यात आफ्रिकेत ब्रिटीश लष्करात असलेल्या पिंगली व्यंकय्या या काँग्रेस कार्यकर्त्याने एक झेंडा तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला. गांधीची आणि पिंगली व्यंकय्या यांची भेट दक्षिण आफ्रिकेत झाली होती.

पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या झेंड्यात लाल आणि हिरवे असे दोनच रंगांचे पट्टे होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन धर्मांचं ते प्रतीक होतं. मात्र महात्मा गांधीनी देशातील इतर सर्व धर्मांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी यात पांढऱ्या रंगाचा पट्टा समाविष्ट करायला सांगितला आणि देशाची प्रगती दाखवण्यासाठी चरख्याचं चिन्हही या ध्वजात घेण्यात आले.

 

– तिरंगी झेंडा आणि चरखा

१९२९  सालच्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात ‘पूर्ण स्वराज्या’चा ठराव संमत झाला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं संपूर्ण नेतृत्व काँग्रेसकडे होतं. त्यानंतर १९३१ मध्ये आज आपण पाहत असलेल्या तिरंगी ध्वजाची रचना अस्तित्वात आली. काँग्रेस पक्षाने केशरी, पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला ध्वज एकमताने स्वीकारण्यात आला. हाच काँग्रेस पक्षाचाही झेंडा होता. आतापर्यंत झेंड्यातील रंगांकडे विविध धर्मांचं आणि गटांचं प्रतीक म्हणून पाहिलं जात होतं. पण या ठरावाने या रंगांचा धर्मांशी असलेला अर्थ काढून टाकला.

– तिरंगा ध्वज, १९४७

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समिती स्वतंत्र भारताच्या कारभारासाठीचा व्यापक आराखडा तयार करत होती. यावेळी स्वतंत्र भारताच्या ध्वजाबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी घटना समितीने १९३१ सालच्या ध्वजात केवळ एकच बदल केला. ध्वजातील चरखा बदलून त्याजागी सारनाथच्या अशोकस्तंभावर असलेलं धर्मचक्र घेण्यात आले, हाच ध्वज आज आपण अभिमानाने फडकावतो.

 

परदेशांत भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करताना, भारतात ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्याची लढाई लढताना तब्बल पाच वेळा ध्वज बदलण्यात आले. प्रत्यक्षात मात्र 15 ऑगस्ट 1947 ला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्याची ग्वाही देताना भारतीयांनी झेंडा अभिमानाने फडकवला. त्यानंतर २६ जानेवारी २००२ रोजी भारताच्या ध्वज संहितेत बदल करण्यात आले. यात देशातील सर्व नागरिकांना आपल्या घरांवर, कार्यालयांवर किंवा कारखान्यांवर वर्षाच्या कुठल्याही दिवशी झेंडा फडकवण्याची परवानगी देण्यात आली. अट फक्त एकच झेंड्याचा अवमान होऊ नये यासाठी ज्या अटी घातल्या आहेत, त्या सर्व अटींचं पालन केलं जावं.

 

● ध्वज कसा वापरावा आणि कशासाठी वापरता येत नाही?

भारताच्या ध्वज संहितेनुसार, ध्वज कोणत्याही ऋतूत शक्यतो सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत फडकवला जावा. मात्र वेशभूषा, कपडे, सांप्रदायिक फायद्यासाठी झेंड्याचा वापर करू नये. राष्ट्रध्वजापेक्षा अधिक उंचीवर दुसरा झेंडा फडकवू नये. झेंड्यावर कोणतीही वस्तू, चिन्हं, फुलं, हार ठेवू नयेत. पण राष्ट्रीय उत्सवांच्या दिवशी ध्वजवंदनापूर्वी झेंड्यात फुले ठेवण्यास परवानगी आहे.
त्याचबरोबर ध्वजाचा जमिनीला स्पर्श होऊ दिला जाऊ नये किंवा तो पाण्यात भिजू नये. गाड्या, होड्या, विमानं यांच्या टपावर किंवा पाठीमागे तो बांधू नये. 

 

आमच्या टेलिग्राम वाहिनीत सहभागी व्हा 👉@marathibrainin


विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा  www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा  writeto@marathibrain.in वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: