राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदी मनीषा म्हैसकर
ब्रेनवृत्त | मुंबई
राज्याच्या पर्यावरण विभागाच्या नव्या प्रधान सचिव म्हणून मनीषा म्हैसकर यांनी काल पदभार स्वीकारला. श्रीमती म्हैसकर या १९९२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी राज्यात विविध विभागात कामकाज केले आहे.
विविध योजनांतून व उपक्रमांतून बदलत्या हवामानाची व पर्यावरणाची दखल घेण्याचे काम राज्याचा पर्यावरण विभाग करीत असतो. “पर्यावरण संरक्षणात शासकीय उपाययोजना, पर्यावरण विषयक कायदे, व्यापक जनजागृती आणि सर्वसामान्य माणसाचा आग्रही सहभाग याकरीता पर्यावरण विभागाचे कामकाज अधिक गतीमान करण्यावर भर दिला जाईल”, असे म्हैसकर यांनी यावेळी सांगितले.
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असंलेल्या म्हैसकर यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात काम करताना, तसेच राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक म्हणून नावीन्यपूर्ण योजनांतून शासकीय कामकाजाच्या प्रसिद्धीला वेगळी दिशा दिली होती. विशेषत: लोकराज्य मासिकाचा वाचक वर्ग व लाखो प्रतिंचे वितरण हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले.
गेली पाच वर्षे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून काम करीत असताना केंद्रीय स्तरावर राज्याला सातत्याने अव्वल स्थानावर नेण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांचा यापूर्वीचा मुंबई महानगरपालिकेत साडेचार वर्षे अतिरिक्त आयुक्त म्हणून आरोग्य क्षेत्रातील कामाचा अनुभव लक्षात घेऊन मुंबई शहरातील ‘कोव्हिड-१९’ च्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नेमण्यात आलेल्या कृती दलात (टास्क फोर्स) त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.