मुंबईकरांसाठी मोठी बातमी : लोकल प्रवासाची मुभा!
ब्रेनवृत्त | मुंबई
मुंबई व परिसरातील कित्येक लोक ज्या गोष्टीची वाट बघत होते, ती मागणी आता पूर्ण झाली आहे. कोव्हिड-१९ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या मुंबईकर नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यातील जनतेला आज संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई लोकलबाबत ही घोषणा केली.
“येत्या १५ ऑगस्टपासून मुंबईची लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होईल. मात्र लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा असेल. यासाठी एक अनुप्रयोग (अप्लिकेशन) तयार केले जाणार असून, त्याआधारे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासासाठी पास घेता येईल. तसेच, हा पास ऑफलाईन पद्धतीनेही उपलब्ध करण्यात येईल”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
वाचा : वातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही!
सोबतच, अजून कोणते निर्बंध शिथिल करण्यात येऊ शकतात याबाबतच विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. “सोमवारी आपण कृती दलाकडून कोव्हिड-१९ च्या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. त्यानंतर आणखी कोणते निर्बंध शिथिल करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. याला साधारण ८ ते १० दिवस लागतील. त्यासाठी आपल्या संयम ठेवावा लागेल. अनेकजण हे उघडा, ते उघडा अशा मागण्या करत करत होते, पण जनता त्यांना बळी पडली नाही”, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Mumbai local train services to start from August 15 for people who have taken both the doses of COVID19 vaccine: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray pic.twitter.com/DCdvrnA2WO
— ANI (@ANI) August 8, 2021
हेही वाचा | उपनगरीय रेल्वेच्या सुमारे ४५% महिला प्रवासी असुरक्षित
दुसरीकडे, राज्यातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना संसर्ग कायम असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल, असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी संबंधित परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Join @ मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in