नियोजित मार्ग व्यस्त असल्यावने ओडिशामार्गे गेली श्रमिक रेल्वेगाडी
ब्रेनवृत्त, २४
देशभरातून कामगार व प्रवाशांना आपापल्या राज्यात, जिल्ह्यात सोडण्यासाठी केंद्र शासनाने ‘श्रमिक विशेष रेल्वे‘ सोडल्या आहेत. मात्र, २१ मे २०२० रोजी कामगारांसाठी वसईहून गोरखपूरला सोडलेली श्रमिक विशेष रेल्वेगाडी थेट गोरखपूरला न जाता ओडिशामार्गे गेली. त्यामुळे प्रवास लांबल्याने कामगारांमध्ये काही वेळासाठी गोंधळ उडाला. मात्र, नियोजित मार्ग व्यस्त असल्यानेच गाडीला दुसऱ्या मार्गाचा पर्याय अवलंबावा लागला, असा खुलासा पश्चिम रेल्वेने दिला आहे.
वसई ते गोरखपूर श्रमिक रेल्वे २१ मे ला सुटल्यानंतर २२ मे ला उत्तर प्रदेशच्या गोरखपूर स्थानकात पोहोचणार होती. परंतु, शनिवारी (ता. २२) सकाळी सातच्या सुमारास ही गाडी ओडिशाच्या राऊरकेला स्थानकावर पोहोचली. तब्बल ३६ तासांच्या प्रवासानंतर गाडी ओडिशामार्गे आल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. हा प्रवास लांबल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे जेवणाचे हाल व अन्य सुविधांची वानवा होत आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
दरम्यान, देशभरातून एकाच वेळी उत्तरेकडे सोडलेल्या गाडय़ांमुळे श्रमिक गाडय़ांचे वेळापत्रकच बिघडले आहे. यासंदर्भात स्थानकातील रेल्वे अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता कोणतीही माहिती अथवा घोषणा रेल्वे प्रशासनाने केली नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे, पश्चिम रेल्वेने या संदर्भात आपले स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वेतील संबंधिताने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतून श्रमिक गाडय़ा सुटताना सुरुवातीच्या स्थानकापासून खाण्यापिण्याची व्यवस्था राज्य सरकार करते. परंतु बहुतांश वेळा मुंबईतून सुटणाऱ्या सुरुवातीच्या गाडय़ांमध्ये प्रवासात राज्य सरकारकडून खानपान सुविधा दिलीच गेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
‘श्रमिक विशेष रेल्वे’गाड्यांतून १२ लाख प्रवासी घरी पोहचले
पश्चिम रेल्वेने याविषयी स्पष्टीकरण देत म्हटले की, कल्याण, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, माणिकपूरमार्गे जाणाऱ्या मार्गावर धावत असलेल्या श्रमिक गाड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली आहे. या व्यस्त मार्गामुळे वसई ते गोरखपूर गाडीसाठी बिलासपूर, राऊरकेला, आसनसोल या पर्यायी मार्गाने नेण्यात आले. तर, उत्तर प्रदेश, बिहारकडे मोठ्या संख्येने श्रमिक रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे भुसावळ, इटारसी, जबलपूर मार्गावर गाडय़ांची कोंडी झाली असून, अनेक गाड्या एकामागोमाग उभ्याच राहात आहेत. या व्यस्त मार्गावरून न जाता पश्चिम, मध्य आणि कोकण रेल्वेवरून सुटणाऱ्या श्रमिक रेल्वेगाड्यांना बिलासपूर, राऊरकेला मार्गाचा पर्यायी मार्ग द्यावा लागत आहे. वसई ते गोरखपूर रेल्वे गाडीचा प्रवास साधारण २५ ते २६ तासांचा आहे. मात्र, दुसऱ्या मार्गावरून वळवल्याने याच प्रवासात साधारण १५ तासांची भर पडली आहे. हीच परिस्थिती मुंबईतून उत्तर प्रदेश, बिहारला जाणाऱ्या अन्य गाड्यांची आहे.
◆◆◆