उत्तरप्रदेश लोकसंख्या धोरण जाहीर; काय आहेत उद्दिष्टे?

ब्रेनवृत्त । लखनऊ


उत्तरप्रदेशमधील लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी तसेच बालमृत्यू व मातामृत्यू कमी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज राज्याचे लोकसंख्या धोरण जाहीर केले. वाढती लोकसंख्या ‘विकासातील मोठा अडथळा’ असून, गेल्या चार दशकांपासून या मुद्यावर चर्चा होत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उत्तरप्रदेश शासनाने  उत्तरप्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-२०३० (Uttar Pradesh Population Policy 2021-2030) जाहीर केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याद्वारे अनावरण करण्यात आलेल्या या धोरणात स्त्रियांमधील स्थूल प्रजनन दर (gross fertility rate) २०२६ पर्यंत २.१ वर  आणि २०३० पर्यंत १.९ वर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

लोकसंख्या धोरण जाहीर करताना आदित्यनाथ म्हणाले, ” वाढती लोकसंख्या विकासाच्या मार्गात अडथळा असल्याची चिंता जगभरात वेळोवेळी व्यक्त करण्यात आली आहे. मागील चार दशकांपासून या मुद्यावर जगभर चर्चा सुरु आहे. याबाबत राज्याने व देशाने विविध प्रयत्न केले असून, त्यानुसार सकारात्मक बदलही झाले आहेत, पण तरीही अजून व्यापक प्रयत्नांची गरज आहे.”समाजातील सर्व घटकांना लक्षात ठेवून उत्तरप्रदेश शासन याबाबत प्रयत्न करत आले आहे.

काही दिवसांपूर्वी  उत्तरप्रदेश विधी आयोगाच्या संकेतस्थळावर लोकसंख्या नियंत्रणाशी संबंधित विधेयकाचा मसुदा प्रकाशित करण्यात आला आहे. या विधेयकात नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्या कळवण्यासाठी १९ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रस्तावित विधेयकानुसार, राज्यातील दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्या नागरिकांना स्थानिक संस्थांची निवडणूक लढवता येणार नाही, शासकीय नोकरीत बढती मिळणार नाही व कोणत्याही प्रकारच्या शासकीय अनुदानाचा लाभ घेता येणार नाही.

वाचा । ९ मोठ्या घोषणांसह ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ देशभर लागू करण्याचा निर्णय

> उत्तरप्रदेश लोकसंख्या धोरणाच्या संबंधित मुद्दे : 

  • उत्तरप्रदेश राज्यतील लोकसंख्या नियंत्रित व स्थिर करण्याचे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • या धोरणात स्त्रियांमधील स्थूल प्रजनन दर (gross fertility rate) २०२६ पर्यंत २.१ वर  आणि २०३० पर्यंत १.९ वर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 
  • नवजात बालकांचे मृत्यू दर (IMR) व मातामृत्यू दर (MMR) कमी करणे.
  • ५ वर्षांखालील मुलांचे मृत्यू रोखणे व त्यांच्या पोषणाची स्थिती सुधारणे. 

दरम्यान, भाजपशासित उत्तरप्रदेश शासनाच्या प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर टीका करताना समाजवादी पक्षाचे खासदार शफिकउर रहमान बर्क म्हणाले, की जर लोकांना मुले जन्मास घालण्यापासून प्रतिबंधित करण्यात येईल, तर मग भविष्यात एखादी युद्धस्थिती ओढावल्यावर भारत मनुष्यबळ कुठून आणेल? या पृथ्वीवर किती लोकांनी जन्म घ्यावा हे ठरवणारा अल्ला आहे आणि कोणत्याही प्रकारची तपासणी या गोष्टीला नियंत्रित करू शकत नाही. पीटीआय 

 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

👉 फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

📧 ✒️ तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: