तब्बल १२ तास चौकशी आणि शेवटी अटक!
ब्रेनवृत्त | मुंबई
काल (सोमवारी) तब्बल १२ तास चौकशी केल्यानंतर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने (इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) काळा पैसा व भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. अनिल देशमुख काल चौकशीसाठी केंद्रीय संस्थेसमोर हजर झाले होते.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. २९ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांना काल ईडीच्या चौकशीला उपस्थित व्हावे लागले. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे जाहीर केलेले आदेश न्यायालयाने फेटाळून लावावे, अशी याचिका देशमुखांनी न्यायालयात सादर केली होती.
दरम्यान, अनिल देशमुख यांना चौकशीच्या वेळी कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले आणि त्यावेळी कोणकोणत्या बाबी स्पष्ट झाल्या हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु, काल झालेल्या तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर त्यांना भ्रष्टाचार व काळा पैसा संग्रहणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी चुकीचं काम केल्याचे म्हणता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय
● ईडीने पाठवले होते याआधी ४ समन्स
२५ जून २०२१ रोजी ईडीने अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाच्या घरावर शोध मोहीम काढली होती आणि त्यानंतर नमूद तारखेला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश (समन्स) दिले होते. त्यानंतर ईडीने देशमुखांच्या नावे पुन्हा २८ जून व २ जुलै रोजी असे दोन समन्स जाहीर केले, परंतु तिन्ही वेळ देशमुखांनी स्वतः उपस्थित न राहता त्यांच्या प्रतिनिधीच्याद्वारे लिखित प्रतिक्रिया पाठवली होती.
२० मार्च २०२१ रोजी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आरोप केला होता, की तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख गैरमार्गाने पैसे गोळा करण्यासाठी त्यांच्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर करत आहेत. अनिल देशमुखांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे व इतरांना मुंबई परिसरातील बार आणि रेस्टॉरंट्समधून महिन्याला ₹१०० कोटी जमा करण्याचे आदेश दिल्याचे आरोपही या पत्रात करण्यात आले होते.
शिल्पाच्या अडचणी वाढल्या; लखनऊमध्ये मायलेकींवर गुन्हा दाखल!
त्यानंतर लगेच मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश केेंद्रिय तपास यंत्रणेला दिले होते. त्यानंतर या प्रकरणात ईडीचा शिरकाव झाला आणि अनिल देशमुख यांच्या विरोधात काळ्या पैशाचा तपास सुरू झाला.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.inसोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in